आज मला माझ्या मोबईलवर एक एसएमएस आला -
“तुमच्या सगळ्यांच्या असण्यानेच माझे आयुष्य परिपूर्ण आहे. प्रत्येकाने मला काहीतरी दिले आहे, शिकवले आहे. Thank you so much guys for being there in my life... तुम्ही सगळेच माझ्या आयुष्यात महत्त्वाचे आहात.”
महेंद्र पितळेचा मेसेज हा अपघातात जखमी झालेल्या हात पाय गमावलेल्या अशा लोकांसाठी एक आदर्श झालेला आहे. 2006 च्या मुंबई रेल्वेवरील आतंकी हल्लात महेंद्रचा हात गेला. आज 30 नोव्हेंबर 2019च्या दिवशी त्याने मला मेसेज पाठविला, धन्यवाद!
महेंद्रने पाठविलेला मेसेज
अमेरिकेत 30 नोव्हेंबर हा दिवस “आभार प्रदर्शन दिवस” (थँक्स गिव्हिंग डे) म्हणून साजरा केला जातो. आपल्या आयुष्यात ज्यांनी आपल्याला मदत केलेली असते त्या व्यक्तीचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्या दिवशी ज्यांनी आपल्याला मदत केली असेल त्याची आठवण करून त्यांचे आभार मानतो. 30 नोव्हेंबरच्या संध्याकाळी महेंद्रचा मला आभार प्रदर्शनचा (थँक्स गिव्हिंग) मेसेज आला.
2 डिसेंबरला बेळगावला मी माझ्या नातेवाईकांच्या लग्नासाठी गेलो होतो आणि तिथे महेंद्रच्या ओळखीचा मित्र भेटला व त्याच्याकडून मला कळलं महेंद्रची आई 28 नोव्हेंबरला स्वर्गवासी झाली होती. आईच्या दु:खात असूनही मला 30 नोव्हेंबरला महेंद्रने थँक्स गिव्हिंगचा मेसेज पाठवला याचे मला खरचं आश्चर्य वाटते.
गेल्या 13 वर्षात अधूनमधून महेंद्र मला असे मेसेजेस पाठवत असतो. ह्या वेळचा त्याचा धन्यवादाचा मेसेज यासाठी होता की, आता रेल्वे मध्ये त्याला उचित काम मिळालं, काही आठवड्यापूर्वी महेंद्रला हवी असलेली नोकरी पश्चिम रेल्वे मॅनेजरच्या चर्चगेट येथील मुख्यालयामध्ये त्याला क्लर्कची पोस्टिंग मिळाली. 13 वर्षानंतर पुन्हा एकदा महेंद्रने समाधान व्यक्त केले.
कोण आहे महेंद्र पितळे?
- महेंद्र पितळे 11 जुलै 2006 मध्ये मुंबईत जे रेल्वेचे सिरीअल बॉम्बब्लास्ट घडले त्यातील एक जखमी व्यक्ती.
- 2006 ला जोगेश्वरी स्टेशनवर झालेल्या बॉम्बब्लास्ट मध्ये महेंद्रने आपला डावा हात गमावला होता.
- तो व्यवसायाने फाईन आर्टिस्ट असल्यामुळे अर्थातच त्यासाठी दोन्ही हातांची गरज असतेच.
- कल्चर, कार्विंग, आर्किटेक्चर संबंधित अशा एका फर्म मध्ये हा नोकरी करत होता.
- आई, बाबा आणि दोन भाऊ असे याचे कुटुंब. कुटुंबाचा सर्व भार याच्यावर आणि अश्यातच त्याने आपला हात गमावला.
- साधारणतः चार - सहा महिने तो अत्यंत निराश अवस्थेत होता.
- ब्लास्ट झाल्यानंतर पुढील काही दिवसानी त्याचा माझ्याशी संपर्क झाला.
- त्याच्याशी बोलता बोलता लक्षात आल की ऑटोबॉक कंपनीकडून त्याला इलेक्ट्रॉनिक हात देता येईल. ज्याच्या सहाय्याने तो आपलं आयुष्य पुन्हा नव्याने सुरु करु शकेल, जगू शकेल.
- या बॉम्बब्लास्ट मध्ये ज्यांचे हात, पाय गेलेत अश्यांना ऑटोबॉक कंपनीकडून आधुनिक इलेक्ट्रॉनिक हात, पाय मिळवून दिले गेले.
आधुनिक कृत्रिम हातासह महेंद्र
- या मॉर्डन इलेक्ट्रॉनिक हातामुळे तो काहीसा खूष झाला. परंतु त्याला या हाताने ज्या पद्धतीची कामे करत होता म्हणजे पेंटींग, कार्विंग ती कामे करणे कठीण होऊ लागले.
- त्यानंतर महेंद्र प्रोस्थेटिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या लोकांना भेटायला गेला. त्यांनी काही अपंग लोकांचे व्हिडिओ त्याला दाखवले ते पाहून त्याचे मनोबल वाढले.
- बॉम्बब्लास्ट नंतर जेव्हा तो पुन्हा कंपनीत कामावर रुजू झाला तेव्हा त्याच्या मालकाने सांगितले की तू कॉम्प्युटरवर काम कर, जी बाकी दोन्ही हाताची कामे आहेत ती तुला करता येणार नाहीत, जमणार नाहीत.
- मग तो कॉम्प्युटरवर काम करू लागला, अर्ध्या पगारात काम करायला सुरुवात केली.
- त्याच दरम्यान या बॉम्बब्लास्ट मध्ये जे अपंग व्यक्ती होते त्यांना रेल्वेने नोकरी देण्याचे घोषित केले होते. महेंद्रची सर्व कागदपत्रांची पूर्तता 2008 मध्येच झाली होती.
- रेल्वेच्या नोकरीसाठी बराच प्रयत्न सुरु होता त्याचाही व आमचाही. पश्चिम रेल्वेचे डी. आर. एम. ऑफिस, जी. एम. ऑफिस, रेल्वे मिनिस्टर ऑफिस यांच्याबरोबर सतत पाठपुरावा, पत्र व्यवहार चालूच ठेवला.
- डिसेंबर 2015 महेंद्रला पश्चिम रेल्वे मध्ये खलाशी या पदावर ग्रुप डी मध्ये नोकरी मिळाली.
पश्चिम रेल्वेत ग्रुप डी मध्ये नेमणूक झाल्याचे पत्र
- रेल्वेने त्याची नेमणूक कोच केअर सेंटरमध्ये केली, त्याने काही दिवस चिकाटीने अवजड/मेहनतीचे काम देखील केले पण ते त्याला खूप दिवस शक्य झाले नाही. त्याच्यासाठी योग्य काम असलेल्या ठिकाणी बदली व्हावी अश्या प्रकारचा अर्ज त्याने जनरल मॅनेजर, पश्चिम रेल्वे यांच्याकडे केला.
महेंद्रचा अर्ज
- पश्चिम रेल्वेच्या जनरल मॅनेजरला पत्र लिहूनही काही हलचाल होत नाही कळल्यावर तो पुन्हा माझ्याकडे आला व मला विनंती केली की, “साहेब माझी बदली ग्रुप डी मधून ग्रुप सी मध्ये होण्यासाठी सहकार्य करा”
- त्यानुसार मी महाव्यवस्थापक (GM) आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) पश्चिम रेल्वे यांना पत्रातून कळविले की महेंद्र हा मुळात एक आर्टीस्ट व संगणक वापर करणारा असून ग्रुप डी मधील कामात त्याच्याकडे असलेल्या कार्यक्षमतेचा (Protential) पूर्णपणे उपयोग रेल्वेला होत नाही.
ग्रुप डी मधून सी मध्ये बदली करण्यासाठी जनरल मॅनेजर, पश्चिम रेल्वे यांना लिहिलेले पत्र
- तेव्हा त्याला ग्रुप सी मध्ये घेऊन लेखनिक म्हणून नेमणूक करावी व त्यांना असे ही सांगितले की जर अश्या प्रकारच्या दिव्यांगाना रेल्वे ऑपरेशन संबंधित कामे दिल्यास, महाव्यवस्थापकांना कामगारांच्या कुवतीनुसार काम देणे शक्य आहे, अश्या प्रकारचे पत्र रेल्वे मंत्रालयाने पाठविले.
भारतीय रेल्वे मंत्रालयाचे दिव्यांगांसाठी योग्य कामे देण्याबाबतचे पत्र
- बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर महेंद्रला ग्रुप सी मध्ये बदली मिळाली व सध्या तो काम करत आहे.
ग्रुप सी मध्ये बदली केल्याचे नेमणूक पत्र
- नोकरी करताना देखील तो शांत बसला नाही, महेंद्रने हात गमावल्यानंतर स्वत: ची नवीन ओळख उभी केली, नवीन विश्व तयार केलं, नवीन दिशा ठरवली आणि त्या दिशेने तो वळला.
- पुन्हा उदासीनतेच्या गर्तेत न पडण्याचा निर्धार करून तो रॉयल एनफिल्ड बुलेट रायडर्सच्या गटामध्ये सामील झाला आणि जागृती करण्यासाठी क्रॉस कंट्री टूरस करायला सुरवात केली, अगदी लडाखपर्यंत तो बाईक वरून जाऊन आलेला आहे.
- महेंद्रने नेहमी ज्यांनी अपघातात एखादा अवयव गमावला असेल अशा व्यक्तींना जाऊन भेटणे, त्यांना प्रोत्साहित करणे, त्यांना इलेक्ट्रॉनिक अवयवांचा वापर कसे करता येते, नव्याने आयुष्य कसे घडवता येते, कसं जगता येते यांची माहिती देण्याचे कार्य सुरु केले. त्यामुळे अशा व्यक्तींना एक मानसिक आधार देत असतो.
तसेच दरवर्षी 11 जुलैला न चुकता माझ्या बरोबर रेल्वे अपघातातील बळींच्या पुण्यतिथीनिमित्त माहीम येथील श्रद्धांजली कार्यक्रमात सामील होतो व बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन करतो.
श्रद्धांजली कार्यक्रमात उपस्थिती
एखाद्याला आयुष्यात परत उभे करून त्याचे जीवन योग्य मार्गाला लावणे यात एक वेगळेच समाधान मिळते.